अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नरभक्षक बिबट्यांकडून वारंवार हल्ले होत असतानाच आता पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत पाच वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. बिबट्याने उचलून नेलेल्या मुलीचं नाव रियांका सुनील पवार (वय ५) असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खारेकर्जुने येथील शेतावर काही कुटुंबे मजूर म्हणून वास्तव्यास आहेत. त्यातच रियांका कुटुंबासह शेतावर वास्तव्यास होती. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास थंडी वाढल्याने कुटुंबातील सदस्य घरासमोर शेकोटीजवळ बसले होते. रियांका देखील शेकोटीजवळ खेळत असतानाच शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि क्षणातच चिमुकलीला उचलून नेलं. आईने आरडाओरड करत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्या अंधारात अदृश्य झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर पोलिस आणि वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आलं, मात्र अद्यापही मुलीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामस्थांनी तातडीने पिंजरा बसवण्याची आणि बिबट्याला पकडण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे. प्रशासनाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं असून, लहान मुलांना एकटं सोडू नये आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या आहेत.




