पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताने हाहाकार माजला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही कंटेनरना अचानक आग लागली असून त्यांच्या मधोमध एक कार अडकली. या कारमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे आठ वाहने सहभागी होती, ज्यामध्ये १० हून अधिक लोक जखमी झाले. दुर्दैवाने, अधिकाऱ्यांनी या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
प्रत्य्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही वाहनं एकाच दिशेने भरधाव वेगाने जात असताना पुढील कंटेनरनं अचानक ब्रेक लावला. मागून येणाऱ्या कारचालकाला वाहन नियंत्रणात आणता न आल्याने कार थेट पुढील कंटेनरला धडकली. त्यानंतर मागील कंटेनरही कारवर जोरात आदळला. या धडकेनंतर काही क्षणातच दोन्ही कंटेनरना आग लागली.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस तातडीने दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या घटनेनंतर परिसरात धूर आणि आगीचे लोट पसरले होते. नवले पुल परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Pune famous accident bridge Navle bridge accident #Pune #Navale pic.twitter.com/whuOPcvGAX
— सुदर्शन कणसे 🇮🇳 (@SudarshanKanse) November 13, 2025




