मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’च्या बाहेर जिलेटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. आता या घटनेबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपित दहशतवादी संघटना जैश-उल-हिंद ने टेलिग्राम चॅनलवरून अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ते चॅनेल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बनविण्यात आले होते. केंद्राच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला अशी माहिती मिळाली आहे की खासगी सायबर एजन्सीला तपास एजन्सीने फोन ट्रॅक करण्यास सांगितले. हा तोच फोन होता ज्यावर टेलीग्राम चॅनेल बनविला गेला होता. केंद्रीय एजन्सींनी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला ही माहिती दिली असल्याची माहिती आहे. खासगी सायबर फर्मने तयार केलेल्या सुरक्षा विश्लेषणाच्या अहवालानुसार, हे टेलिग्राम चॅनेल 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ‘टार’ नेटवर्कद्वारे तयार केले गेले. ज्याचा वापर डार्क वेबमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो. हे ज्या सिमकार्डद्वारे केले गेले त्याचे लोकेशन तिहार जेलमध्ये येत आहे. (डार्क वेब इंटरनेटचा एक असा भाग आहे ज्यामध्ये केवळ TOR सारख्या अज्ञात नेटवर्कद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो, पारंपारिक सर्च इंजिनद्वारे नाही.)
काय घडलं होतं ?
28 फेब्रुवारी रोजी ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेने स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ अँटिलियाच्या बाहेर उभी केल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, यानंतर दुसर्याच दिवशी ‘जैश-उल-हिंद’ ने दुसर्या टेलिग्राम वाहिनीवरून एक पोस्टर जारी केले आणि यात त्यांच्या संघटनेचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यात म्हटलं होतं कि, “आम्हाला पोस्टरवरून हे स्पष्ट करायचे आहे की जैश-उल-हिंदचा या घटनेशी काही संबंध नाही. मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेरची घटना, कथित टेलिग्राम खाते आणि पत्राशी आमचा काहीही संबंध नाही. बनावट पोस्टर लावल्याबद्दल आम्ही भारतीय गुप्तचर संस्थांचा निषेध करतो. आम्ही कुफ्रास (जे देवावर विश्वास ठेवत नाहीत) त्यांच्याकडून कधीच खंडणी घेत नाहीत आणि भारतीय व्यावसायिक जगतातल्या टायकून्सशी आमचा लढा नाही. आमचा लढा भाजप आणि संघाविरोधात आहे.”




