पुणे : पुण्यात मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील बोपदेव घाट परिसरातून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. बोपदेव घाटामध्ये एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बोपदेव घाटात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही मुलगी जखमी अवस्थेत सापडली असून तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा आहेत. तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशा घटनांमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




