मुंबई: एका पोलीस कॉन्स्टेबलचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. हा पोलीस हवालदार सुमारे सहा ते सात तास गंभीर अवस्थेत रेल्वे रुळावर पडून राहिला. परंतु, वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमित ज्ञानेश्वर गोंदके (वय २८) असं या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
बुधवारी गोंदके कर्तव्य बजावल्यानंतर डोंबिवली येथे आपल्या घरी निघाले होते. रात्री ९.३० च्या सुमारास अंधेरी ते घाटकोपर असा मेट्रोने प्रवास केल्यानंतर पुढील प्रवासासाठी ते लोकल ट्रेनमध्ये गेले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी डोंबिवलीसाठी लोकल पकडली. लोकलला प्रचंड गर्दी असल्याने ते ट्रेनच्या दारात उभे होते. मात्र ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान ते लोकलमधून खाली पडले. लोकलमधून खाली पडल्याने गोंदके गंभीर जखमी झाले. त्यांचा खांदा आणि हात मोडला. त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. रात्रभर ते जखमी अवस्थेत तसेच पडून होते. अखेर वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला.
गुरुवारी (२६ सप्टेंबर) सकाळी ७ वाजता एका प्रवाशाने कुर्ला रेल्वे पोलिसांना एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत रुळाच्या बाजूला पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारास उशीर झाल्याने तिथे त्यांना मृत घोषित केले. कॉन्स्टेबलची ओळख त्याच्या गणवेशावरून आणि ओळखपत्रावरून झाली.
अमित गोंदके हे २०१८ मध्ये पोलिस दलात रुजू झाले होते आणि सध्या ते अंधेरी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तैनात होते. बुधवारी मुसळधार पावसामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे तपासात समोर आले. ते लोकल ट्रेनच्या दाराजवळ उभे असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले.