नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता देशाला आणखी एका सुवर्णपदकाची आशा आहे. भारताला कुस्तीपटू विनेश फोगाटकडून सुवर्णपदकाची आशा आहे. विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे. यानंतर विनेश फोगाट म्हणाली कि, हा फक्त एक मैलाचा दगड आहे, अजून ध्येय गाठायचे आहे. विनेश फोगाटने अंतिम फेरीत मजल मारल्यानंतर आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला आणि हे सांगितले.
एकाच दिवसात तीन सामने जिंकले
विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकच्या ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात जोरदार कामगिरी केली आणि एकाच दिवसात तीन सामने जिंकले. तिने प्रथम टोकियो ऑलिम्पिकच्या चॅम्पियनचा पराभव केला आणि नंतर युरोपियन चॅम्पियनला हरवलं. यानंतर तिच्या समोर पॅन अमेरिका चॅम्पियन आली, मात्र भारताच्या विनेश फोगाटने पुन्हा सामना जिंकला.
उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर विनेश फोगाट तिची आई आणि कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलवर बोलली. विनेश फोगाटने हात जोडून आईला अभिवादन केले. त्यानंतर आई आणि कुटुंबीयांनी विनेशला आशीर्वाद दिला. यादरम्यान, विनेश फोगाटने तिच्या आईला वचन दिले की ती फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकेल. विनेश व्हिडिओमध्ये ‘गोल्ड आणायचं आहे… गोल्ड’ असे म्हणताना दिसली.
विनेश फोगाटची थेट फायनलमध्ये एन्ट्री
ऑलिम्पिकमध्ये ५० किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत विनेश फोगाटने दमदार कामगिरी करत फायनलमध्ये मजल मारली. तिने क्युबाच्या युसनेलिस गुझमान लोपेझला ५-० ने पराभूत केलं. त्यामुळे तिचे पदक निश्चित झाले आहे. विनेश आता सुवर्ण पदकासाठी लढणार आहे.