अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे” हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी चुकीच्या पद्धतीने घेतली गेली आहे. तसेच शुक्रवारी रात्री चेन्नई-दिल्लीच्या सामन्याच्या लाईव्ह कॉमेंट्रीतही त्यांनी याबद्दल भाष्य केले.
चेन्नई-दिल्लीच्या सामन्यादरम्यान ते म्हणाले, ‘आम्ही सरावाबद्दल बोलत होतो. लॉकडाऊनबद्दल आम्ही बोलत होतो, तेव्हाच मी म्हणालो की विराट कोहलीलाही लॉकडाऊनमध्ये सराव करण्याची संधी मिळालेली नाही. जो व्हिडिओ मी पाहिला होता त्यात तो त्याच्या इमारतीच्या प्रांगणात खेळताना दिसत होता. तेव्हाच मी म्हणालो की विराट अनुष्काच्या बॉलिंगवर खेळला होता. बस, हेच माझे शब्द होते. ज्यांना याबद्दल काही आक्षेप असेल त्यांनी हे लक्षपूर्वक ऐकावे, मी जे म्हटले त्यात काय गैर आहे? मी कोणतेही अभद्र विधान केले नाही ना कुणावर आरोप केले आहेत.’




