IND vs AUS 2nd T20I : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील दुसरी मॅच देखील टीम इंडियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 195 रन्सचं आव्हान टीम इंडियाने 19.4 ओव्हर्समध्ये पूर्ण करत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने विजय मिळवला.
टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन टीमच्या ओपनर्सने दमदार सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 194 रन करत टीम इंडियासमोर 195 रन्सचं आव्हान ठेवलं. मॅथ्यू वेड याने 32 बॉल्समध्ये 58 रन केले. स्मिथने 46, हेनरिक्सने 26, मॅक्सवेलने 22 रन, स्टोयनीसने नॉट आऊट 16 रन तर शॉर्टने 9 रन केले. टीम इंडियाकडून टी. नटराजन याने चार ओव्हर्समध्ये 20 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
टीम इंडियाकडून केएल राहुलने 30 रन केले. अँड्रू टायने राहुलला बाद केलं. शिखर धवनने 36 चेंडूत 52 रन केले. झॅम्पाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात शिखर बाद झाला. कॅप्टन विराट कोहलीने 24 चेंडूत 40 रन केले. विराट डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर सॅमसनने 15 रन केले. हार्दिक पांड्याने 22 चेंडूत नॉट आऊट 42 रन तर श्रेयस अय्यरने 5 चेंडूत नॉट आऊट 12 रन केले.
पहिल्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 11 रन्सने पराभव केला होता. तीन मॅचेसची टी-20 सीरिज असल्याने आजच्या विजयासह टीम इंडियाने सिरीजही जिंकली आहे.