Shiv Sena, Congress, BJP
राजकारण

मुंबई मनपात तिरंगी लढत; शिवसेना, काँग्रेस, भाजपची टक्कर

मुबई : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या अनेक निवडणुका आता टप्प्याटप्प्याने होण्याची चिन्ह दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेत सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक  होत आहे. निवडणुकीत शिवसेना , काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत दिसणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मनपाचे २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे बजेट ३३ हजार ४४१ कोटी रुपयांचे आहे. पालिकेचे सर्व आर्थिक निर्णय स्थायी समितीच्या मंजुरी नंतरच होतात. याच कारणामुळे मुंबई मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार याला प्रचंड महत्त्व आहे. पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेचा प्रयत्न स्थायीचे अध्यक्षपद जिंकण्याचा आहे. मात्र शिवसेनेविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांना पडद्यामागून नक्की कोणत्या पक्षाचे नगरसेवक पाठिंबा देणार यावर निकाल अवलंबून आहे.

स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत पराभव झाल्यास शिवसेनेच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का लागेल. हे होऊ नये म्हणून शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीसाठी सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे आहे. नगरसेवक फुटू नये म्हणून शिवसेना खबरदारी घेत आहे.

यंदा स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीकरिता सत्ताधारी शिवसेनेने विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी अॅडव्होकेट मकरंद नार्वेकर यांना लढतीत उतरवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. काँग्रेसने नगरसेवक असिफ झकेरिया यांना स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे ११, भाजपचे १० , काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. नियमानुसार शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या व्यक्तीची स्थायी समितीवर पदसिद्ध सदस्यपदी नियुक्ती होते. याच कारणामुळे शिक्षण समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा सदस्य अध्यक्ष झाल्यास स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पारडे जड होईल. स्थायी समितीमधील शिवसेनेचे संख्याबळ ११ वरुन १२ वर जाईल.

शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीकरिता यंदा शिवसेनेच्या संध्या दोषी, भाजपच्या सुरेखा पाटील आणि काँग्रेसच्या संगिता हांडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिक्षण समितीमध्ये सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे सेनेला शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे सहज शक्य आहे. शिक्षण समितीमध्ये शिवसेनेचे १३ (१३ पैकी २ स्वीकृत), भाजपचे १० (१० पैकी १ स्वीकृत), काँग्रेसचे ४ सदस्य आहेत. शिक्षण समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद तिसऱ्या क्रमांकाच्या काँग्रेसकडे आहे. युती तुटली असल्यामुळे मुंबई मनपात शिवसेना पहिल्या आणि भाजप दुसऱ्या क्रमांकाच पक्ष आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावे अशी मागणी करत भाजपने न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. काँग्रेस मनपातील निवडणुका लढवून आपण राज्यात सत्तेत एकत्र असलो तरी पालिकेत विरोधकाची भूमिका चोख बजावत असल्याचे दाखवण्यासाठी निवडणूक लढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या निवडणुकीत आपण जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यावर भाजप मुद्दाम काँग्रेसला मते देऊन शिवसेनेचा उमेदवार पाडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला ही एकच चिंता सतावत आहे.

 

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत