सोलापूर : काय झाडी, काय डोंगर, एकदम ओक्केमध्ये आहे, असं म्हणत महाराष्ट्रच काय, देशभर प्रसिद्धी मिळवलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते शहाजी बापू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एक दिवस माजी मंत्री आदित्य ठाकरे हेच वडील – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून जातील, असं म्हणत शहाजीबापूंनी चर्चेला तोंड फोडलं आहे. ठाकरे गटातील अनेक नेते साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहाजीबापूंनी हे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वास्तवतःच परिस्थिती अशी झालेली आहे, की तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी भावना इथपर्यंत झाली आहे, की एक दिवस असा उगवेल, की उद्धव साहेबांना आदित्य साहेबच सोडायची भाषा करतील” असं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या शहाजीबापूंना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसला. शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बापूंना पराभवाची धूळ चारली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत सातत्याने ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. नुकतंच माजी आमदार राजन साळवी यांनीही सेनेचा झेंडा हाती घेतला. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया विचारली असता, शहाजीबापूंनी ठाकरे पिता-पुत्रांविषयी खळबळजनक वक्तव्य केलं.
दुसरीकडे, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी नगरपंचायतीच्या ८ नगरसेवकांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्याचबरोबर यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आणि उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गोडपिंपरी नगरपंचायतीमधील १७ पैकी ८ नगरसेवकांनी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केल्याचे शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यावेळी उपस्थित होते.