नवी दिल्ली : एका २० वर्षीय तरुणीचा बस प्रवासादरम्यान अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसच्या खिडकीतून बाहेर उलट्या करण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या डोक्याला समोरून येणाऱ्या वाहनाने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दिल्लीच्या अलीपूर भागात घडली असून ही तरुणी रक्षाबंधनाच्या दिवशी पंजाबमध्ये आपल्या भावाला भेटण्यासाठी निघाली होती.
पोलिसांना बुधवारी या घटनेची माहिती नरेला येथील सत्यवाडी राजा हरीशचंद्र हॉस्पिटल (SRHC) रुग्णालयातून मिळाली, जिथे पीडितेला जखमी अवस्थेत नेण्यात आले होते. पोलिस उपायुक्त रवी कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिस रुग्णालयात पोहोचेपर्यंत २० वर्षीय तरुणीला मृत घोषित करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बबली नावाची तरुणी प्रतापगड येथून लुधियाना, पंजाब येथे तिच्या भावाला भेटण्यासाठी जात होती. तिने हरियाणा रोडवेजची बस पकडली होती आणि तिच्यासोबत तिची बहीण पूनम, मेहुणा संतोष आणि त्यांची तीन मुले होती. तरुणी चालकाच्या बाजूने बसलेली होती. दरम्यान, अलीपूर परिसराजवळ आल्यानंतर तरुणीला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तिने उलट्या करण्यासाठी तिचे डोके बसच्या खिडकीतून बाहेर काढले. मात्र, यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाने तिचे डोके चिरडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलीस याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत आहेत. आक्षेपार्ह वाहन आणि त्याचा चालक यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे.




