सिंहगड : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळून एका १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या अपघातात संस्कृती प्रदीप पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) या मुलीचा मृत्यू झाला.
रात्री उशिरा मुळशी आणि सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड सिटीत राहणारे प्रदीप पवार हे त्यांची पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न, मुलगी संस्कृती आणि बहीण सुनीता नारायण शिंदे यांच्यासह सायंकाळी सातच्या सुमारास कारने त्यांच्या मूळ गावी पानशेतकडे जात होते. दरम्यान, कुरण बुद्रुक गावच्या हद्दीतील माऊलाई मंदिराजवळ कारचा उजव्या बाजूचा टायर फुटल्याने पवार यांचा गाडीवरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे भरधाव वेगाने जाणारी कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. प्रदीप पवार, अर्चना पवार, प्रद्युम्न पवार आणि सुनीता शिंदे यांना वाचवण्यात यश मिळाले, पण संस्कृती मात्र गाडीतच अडकून राहिली. रात्री उशिरा खोल पाण्यात बुडालेली कार शोधून बाहेर काढण्यात आली. कारमध्ये संस्कृतीचा मृतदेह आढळून आला.




