मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध केल्यामुळे महिलेला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. बिहारची राजधानी पाटणा येथे फतुहा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आशादेवी लल्लन यादव असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ललन यादवच्या अल्पवयीन मुलीची शेजारीच राहणाऱ्या चंदन कुमार या मुलाने छेड काढली, या प्रकरणात दोन्ही शेजार्यांमध्ये मोठे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच विषयावरून दोन्ही शेजार्यांमध्ये भांडण झाले. गावात उलटसुलट चर्चा होऊ नये म्हणून लल्लन यादवच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. बुधवारी सकाळी काहीजणांनी लल्लन यादव यांच्या घरावर हल्ला चढवला आणि गोळीबार केला. यामध्ये लल्लनची पत्नी आशादेवीचा गोळ्या लागून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यातही घेतले आहे, मुख्य आरोपी चंदन कुमार फरार असून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




