भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच हात असल्याचे पाकिस्तानने कबूल केले आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत म्हटले आहे की, पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारसाठी एक मोठे यश आहे. आम्ही भारतात घुसून मारलं. पुलवामामधील आमचे यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्वात या देशाचे यश आहे. आपण सर्वजण या यशाचा एक भाग आहोत, असं पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलंय.
पाकिस्तानच्या मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. आता काँग्रेस गप्प का आहे? भारतातील दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तान आहे की नाही हे काँग्रेसने सांगावं, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटलं.