देशातील प्रमुख एयरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एयरो इंडिया-२०२१ च्या 13 व्या आवृत्तीचं आयोजन बेंगळुरूच्या येलाहंका एअरफोर्स स्टेशन येथे करण्यात आलं आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) हे आयोजित करत आहे. या शोच्या माध्यमातून भारत जगाला आपले संरक्षण क्षेत्रातील सामर्थ्य दाखवित आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.
राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भारताला अनेक आघाड्यांवर धोक्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एका देशाने पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचा तो बळी आहे, जो आता एक जागतिक धोका बनला आहे. आम्ही आमच्या सीमेवरील स्थिती बदलण्याचे दुर्दैवी प्रयत्न बघत आहोत. परंतु देश आपल्या लोकांचे आणि प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी सदैव सतर्क आहे.
अमेरिकन बॉम्बर विमान बी -१ बी लान्सर एअर शोमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले. हे विमान दक्षिण डकोटा येथील एल्सवर्थ एअरफोर्स बेसच्या 28 व्या विंगचा भाग आहे. ते 26 तास उड्डाण करुन येथे दाखल झाले. लांब उड्डाण करणाऱ्या या सुपरसोनिक विमानाने आपल्या स्थायी तळापासून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन आपल्या मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत.




