सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बार्शी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून गेले होते. आता तब्बल चार महिन्यांनी अजय यांच्या मृतदेहाचा सांगाडा पोलिसांच्या हाती लागला आहे.
अजय चौधरी हे बाजार समितीत तोलार म्हणून काम करत होते. ते 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बार्शीतील तुळजापूर रोड रेल्वे पुलाजवळील ओढ्यातून पाण्यात वाहून गेले होते. प्रशासकीय यंत्रणा आणि नातेवाईकांनी बराच शोध घेऊन देखील त्यांचा पत्ता लागला नव्हता.
बार्शी शहराजवळील एका शेतालगत असलेल्या ओढ्यात काटेरी झाडांमध्ये एक मानवी सांगाडा अडकलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. हा सांगाडा पुरात वाहून गेलेल्या अजय यांचा असल्याची शंका येताच पोलिसांनी अजय यांच्या पत्नीला घटनास्थळावर बोलावून घेतले. अजय यांची पत्नी आपल्या सासू व दीर यांच्यासह घटनास्थळी पोहोचली. या सांगाड्याच्या मानेच्या हाडात शर्ट अडकलेला होता. त्यावरुन तसेच सांगाड्याची बांधणी पाहता अजय यांच्या शरीरयष्टीची मिळता जुळता आहे. त्यामुळे ओढ्यामध्ये सापडलेला सांगाडा पतीचाच असून ते मयत झाले असल्याबाबत खात्री झाली असल्याचा जबाब मयत अजय यांच्या पत्नीने दिला आहे.




