उत्तर प्रदेश : आजी-आजोबांनी PUBG खेळण्यापासून रोखल्यामुळे एका तरुणाने अतिशय धक्कादायक पाऊल उचलले. या तरुणाने आजी-आजोबांना अडकवण्यासाठी सहा वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या केली. उत्तर प्रदेशातील देवरायामधील हरखौली येथील रहिवासी गोरख यादव यांचा मुलगा संस्कार हा गावातच खाजगी शिकवणी शिक्षक नरसिंग शर्मा (60) यांच्या घरी शिकवणीसाठी जायचा. चिमुकल्याने आरडाओरड करू नये, त्यासाठी या तरुणाने त्याच्या तोंडात फेविक्विक टाकले. मृत मुलाचे नाव संस्कार यादव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे आजोबा संस्कारची शिकवणी घ्यायचे. 18 वर्षीय आरोपी तरुणाने या सहा वर्षीय चिमुकल्याची हत्या करून मृतदेह घरातील शौचालयात लपवून ठेवला होता. या तरुणाने आजोबांना तुरुंगात पाठवण्यासाठी याला संस्कारच्या अपहरणाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस तपासात त्याचे नियोजन फसले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
तरुणाने गावातील एका शेतात पत्र टाकून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे मिळाल्यावर विद्यार्थ्याला मुक्त करण्याबाबत पत्रात लिहिले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आणि सुमारे 12 तासांत मृतदेह ताब्यात घेत संपूर्ण घटनेचा पर्दाफाश केला. तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अन्य दोघांनाही ताब्यात घेतले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संस्कार शिकवणीसाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही, त्यामुळे त्याचे वडील उशिरा शिकवणी शिक्षकाच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना संस्कार शिकवणीला आला नसल्याचे समजले. त्यानंतर कुटुंबीयांनी गावात त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान एका शेतात पत्र सापडले, ज्यामध्ये पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
एसपी संकल्प शर्मा रात्रीच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थ्याचा शोध सुरू केला. संशयावरून पोलिसांनी शिकवणी शिक्षकाचा नातू अरुण शर्मा (18) याच्याकडे चौकशी केली असता सत्य समोर आले. त्याने गळा आवळून खून केल्याची कबुली देत संस्कारचा मृतदेह टॉयलेटमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी संस्कारचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. चौकशीदरम्यान आरोपी अरुणने पोलिसांना सांगितले की, त्याचे आजी-आजोबा त्याला नेहमी पबजी खेळण्यावरून आणि पैसे मागण्यावरून रागवायचे. यामुळे तो संतापला होता, त्याने दोघांनाही तुरुंगात पाठवण्याच्या उद्देशाने संस्कारची हत्या करण्याचा कट रचला. बुधवारी ट्यूशनला येताना संस्कार त्याला रस्त्यात भेटला. मग दोघे घराकडे निघाले. घराजवळ पोहोचल्यावर त्याने संस्कारच्या तोंडात फेविक्विक टाकले, जेणेकरून त्याला आरडाओरड करता येऊ नये.




