उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला विरोध केल्यामुळे त्या मुलीच्या वडिलांना छेडछाड करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण करुन ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
पीडित मुलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने छेड काढली. यामुळे रागावलेल्या मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती. यानंतर आरोपी काही लोकांना घेऊन त्या मुलीच्या घरी पोहोचला. त्या सर्व लोकांकडे हत्यारं देखील होती. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी ६ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित कुटुंबाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार असून पोलीस शोध घेत आहेत.