आंध्र प्रदेश : कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई, वडील आणि त्यांची दोन मुले अशा चार जणांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. तसेच, एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत असल्यामुळे ते सर्वजण आत्महत्या करत आहेत.
आंध्र प्रदेशातील कर्नूल शहरातील वड्डगेरी येथे ही घटना घडली आहे. कुटुंबातील चार सदस्यांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. प्रताप (वय 42), हेमलता (36), जयंत (17), रिशिता (14) अशी या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. घरातून पती-पत्नीसह दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रताप हे एक टीव्ही मेकॅनिक होते. मुलगा जयंत एक कोर्स करत होता. तर मुलगी रिशिता सातवीत शिकत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बरेच तास कोणालाही या कुटुंबातील कोणताही सदस्य बाहेर दिसला नाही. त्यामुळे शेजार्यांना हे संशयास्पद वाटले. शेजार्यांनी त्यांच्या घराबाहेर जाऊन दरवाजा ठोठावला, परंतु, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दार उघडले. त्यांना घरात चौघांचे मृतदेह जमिनीवर पडले दिसले. पोलिसांना घरातून एक सुसाइड नोट देखील मिळाली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की त्यांचे अनेक मित्र आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशा परिस्थितीत त्यांना भीती वाटत होती की कदाचित त्यांनाही कोरोनाचा संसर्ग होईल. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.
आंध्र प्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 18,५४,457 रुग्ण आढळले आहेत. सध्या तेथे कोरोनाची 53,880 प्रकरणे ऍक्टिव्ह आहेत. एकूण प्रकरणांपैकी 12,416 जणांचे कोरोना विषाणूमुळे बळी गेले आहेत.




