डोनाल्ड ट्रम्प आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात शेवटची अध्यक्षीय डिबेट आज पार पडली. या डिबेटमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनमध्ये पाहा किती प्रदूषण आहे, रशियामध्ये पहा, भारताचेही उदाहरण घ्या. तिथे हवा किती खराब आहे. अमेरिकेत तसे नाही. अमेरिकेत हवा किती स्वच्छ आहे, पाणी शुद्ध आहे. अमेरिकेत कार्बन उत्सर्जनावर चांगले उपाय अवलंबले आहेत. चीन, भारत आणि रशिया यासारखे देश हे जागतिक प्रदूषणाच्या विषयावर गंभीर नाहीत.
वातावरण बदलाच्या प्रश्नावर अमेरिकेने आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च केलेत पण त्याचा आपल्या देशाला फायदा न होता तोटाच होत होता. त्यामुळे अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली, असंही डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले. वातावरण बदलावर 2015 साली करण्यात आलेल्या या करारामध्ये जागतिक हवामान हे 2 टक्क्यांपेक्षा खाली ठेवण्याचा उद्देश जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी या करारामुळे अमेरिकन उद्योगांना आणि कामगार वर्गाला तोटा होईल या कारणामुळे ट्रम्प यांनी यातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं. या कराराचा सर्वाधिक फायदा हा केवळ चीन आणि भारताला होणार आहे, असं देखील ते सातत्याने म्हणत आले आहेत.
वातावरण बदलाच्या प्रश्नावरुन ट्रम्प यांनी चीन आणि भारतावर याआधीही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं होत की चीन आणि भारत असे देश आहेत की जिथे आपल्याला श्वास घ्यायलाही अडचण येते.




