जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ प्रिजन्स (DG जेल) हेमंत लोहिया यांची सोमवारी रात्री उशिरा त्यांच्याच घरात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यांचा नोकर यासिर याने ही घटना घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. जेलचे डीजी हेमंत लोहिया हे जम्मूच्या बाहेरील उदयवाडा येथे राहत होते. ते 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची डीजी जेल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) या दहशतवादी संघटनेने लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. टीआरएफने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. संघटनेने म्हटले- गृहमंत्र्यांना दिलेली ही आमची छोटीशी भेट आहे. आम्ही कधीही, कुठेही कोणालाही मारू शकतो. दरम्यान, या घटनेनंतर त्यांचा नोकर यासिर फरार आहे. पोलिसांनी यासिरचा शोध सुरू केला आहे.
जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, आधी उशीने तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर लोहिया यांचा गळा चिरण्यात आला होता. त्याच्या अंगावर भाजल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. मारेकऱ्याने केचपच्या बाटलीने त्यांचा गळा चिरला, त्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
केचपच्या फुटलेल्या बाटलीने गळा चिरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याने अगोदर लोहिया यांचे उशीने तोंड दाबले आणि नंतर केचपच्या तुटलेल्या बाटलीचा वापर करून त्यांचा गळा चिरला, त्याने मृतदेह पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्याच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या रक्षकांना लोहिया यांच्या खोलीत आग लागल्याचे दिसले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी या घटनेच्या तपासात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. याआधी सोमवारी दुपारी बारामुल्लामध्ये काही दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरवर गोळीबार केला, पण बँक मॅनेजर या हल्ल्यातून बचावला.




