मुंबई : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरही १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांची दसरा मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे.
पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय?
पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. मुंबईतील गोरेगाव येथे ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांचा म्हाडा आणि बिल्डर सोबत करार झाला. म्हाडा, गुरु आशिष बांधकाम कंपनी आणि रहिवासी यामध्ये हा करार झाला होता. एकूण १३ एकर जागेपैकी साडेचार एकर वर मूळ रहिवाशांना घर आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री बांधकाम करेल असं ठरलं होतं. मात्र गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर ही जागा खाजगी बिल्डरला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात ईडी कडून यापूर्वी गुरु आशिष कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.




