पुणे : सहज उपलब्धता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डॉक्टरांचे प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन या कारणांमुळे डोलो-650 या पॅरासिटामॉलच्या ब्रँडच्या विक्रीत वाढ झाली आहेत. पॅरासिटामॉलच्या सर्व ब्रँडच्या विक्रीत निश्चितपणे वाढ झाली आहे, कारण कोविड -19 चा संसर्ग झालेल्या जवळजवळ प्रत्येकासाठी हे तापासाठी सर्वात सुरक्षित औषध आहे.
मार्केट रिसर्च फर्म AIOCD-AWACS ने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या दुसर्या तिमाहीत आणि 2021 च्या दुसर्या तिमाहीदरम्यान पॅरासिटामॉलद्वारे मिळणाऱ्या महसुलात 138.42 टक्क्यांनी वाढ झाली. Dolo-650 द्वारे मिळणाऱ्या महसुलात याच कालावधीत 289.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्याच वेळी, ग्लॅक्सोस्मिथक्लाइनच्या (GlaxoSmithKline) पॅरासिटामॉलच्या दोन लोकप्रिय ब्रँड – क्रोसिन आणि कॅल्पोल यांच्या कमाईत अनुक्रमे 53 टक्के आणि 158.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अल्केम प्रयोगशाळांनी उत्पादित केलेल्या सुमो या ब्रँडचा महसूल 110.6 टक्क्यांनी वाढला आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस भूपेंद्र कुमार यांनी सांगितले कि, “क्रोसिन आणि डोलो हे पॅरासिटामॉलचे सर्वात सामान्यपणे निर्धारित ब्रँड आहेत. तथापि, 500 mg फॉर्म्युलेशनमध्ये क्रोसिन अधिक सहज उपलब्ध आहे तर डोलो 650 mg फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत लोकांना खूप ताप येत असल्याने अनेक डॉक्टर डोलो लिहून देत होते. आणि, तुम्हाला परिस्थिती माहीत आहे. डॉक्टरांनी एक प्रिस्क्रिप्शन लिहिल्यास ते व्हॉट्सऍपवर प्रसारित केले जाते आणि 10 लोक ते वापरतात. अशाप्रकारे डोलो हे घरगुती नाव बनले, ताप, अंगदुखी आणि वेदनांसाठी लोक त्याचा वापर करू लागले. आणि, सध्याच्या लाटेतही त्याचा वापर केला जात आहे. दुस-या लाटेदरम्यान ब्रँडची सुरुवात प्राधान्यकृत प्रिस्क्रिप्शन म्हणून झाली असली तरी, तिसर्या लाटेत मात्र अनेकांनी प्रिस्क्रिप्शनशिवाय त्याचा वापर सुरू ठेवला आहे.”
डोलो-650 हे 650 मिलीग्राम पॅरासिटामॉल असलेले औषध आहे, एक अँटीपायरेटिक (ताप कमी करणारे) आणि वेदनाशामक (वेदना कमी करणारे) औषध आहे.




