नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’चा मालक कांताप्रसाद यांनी आपला जुना ढाबा पुन्हा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी सुरु केलेले रेस्टॉरंट कमी उत्पन्न आणि जास्त खर्च यामुळे अगोदरच बंद करावे लागले होते. कांता प्रसाद म्हणाले की, कोरोनामुळे दिल्लीची परिस्थिती खूप वाईट झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना ढाबा देखील काही दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उद्भवले आहे.
सोशल मीडियावरील यूट्यूबर गौरव वासनच्या व्हिडिओनंतर प्रसिद्ध झालेले बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी आपला जुना ढाबा पुन्हा सुरू केला आहे. यापूर्वी प्रसिद्धी आणि पैसे मिळाल्यानंतर त्यांनी बाबा का ढाबा नावाचे रेस्टॉरंट सुरु केले होते. परंतु, कमी उत्पन्न आणि जास्त खर्च यामुळे त्यांना आपले रेस्टॉरंट बंद करावे लागले. कांता प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती खूपच वाईट झाली होती. अशा परिस्थितीत, त्यांना ढाबा देखील 17 दिवस बंद ठेवावा लागला, ज्यामुळे विक्रीवर परिणाम झाला. लॉकडाउनपूर्वी रोजची 3,500 रुपयांची होणारी विक्री कमी होऊन आता 1000 रुपयांवर आली आहे. यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे देखील अवघड झाले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट उद्भवले आहे. सध्या बाबा का ढाबामध्ये तांदूळ, डाळ आणि दोन प्रकारच्या भाज्या मिळतात.
लोकांकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर कांताप्रसाद यांनी डिसेंबर 2020 मध्ये आपले नवीन रेस्टॉरंट सुरु केले होते. रेस्टॉरंट सुरूवातीला चांगले चालले. कांताप्रसाद रेस्टॉरंटमध्ये फक्त देखरेख करण्याचे काम करत होते. तर कांताप्रसाद यांची पत्नी आणि त्यांची दोन मुलं काउंटरवर बसायचे. कांताप्रसाद यांनी रेस्टॉरंटमध्ये 5 लाखांची गुंतवणूक केली होती आणि तिघांना नोकरी देखील दिली होती. रेस्टॉरंट चालविण्यासाठी एक महिन्याला 1 लाख खर्च येत होता. रेस्टॉरंटचे भाडे 35,००० रुपये द्यावे लागायचे. याशिवाय तीन कर्मचाऱ्यांचा पगार 36,000 रुपये होता. किराणा आणि भाज्यांचे पैसे वेगळेच लागायचे. परंतु, हे सगळं करून महिन्याचे उत्पन्न कधीही 35000 पेक्षा जास्त मिळाले नाही. एकंदरीत, त्यांनी कबूल केले की रेस्टॉरंट उघडून त्यांनी चूक केली आहे. यामुळे त्यांनी फेब्रुवारी महिन्यातच रेस्टॉरंट बंद करुन आपला जुना ढाबा पुन्हा सुरू केला आहे. तथापि, आता ढाब्यात देखील पूर्वी इतकी कमाई होत नाही.
गेल्या वर्षी यूट्यूबर गौरव वासनने दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का धाबा’ च्या कांताप्रसाद यांची संघर्षाची कहाणी व्हिडिओ बनवून दाखवली होती. त्यात कांताप्रसाद रडत होते, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यांना लोकांकडून लाखो रुपये देखील मिळाले होते. परंतु, पैसे मिळाल्यावर बाबांनी गौरव वासनविरोधात त्याने पैसे चोरल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता कांताप्रसाद पुन्हा पूर्वीच्या स्थितीत आले असून स्वतः ढाब्यात काम करत आहेत.




