मुझफ्फरनगर : कोर्टाने एका ३० वर्षीय महिलेला सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील कोर्टाने या महिलेला दोन दिवसांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, या महिलेने दंड न भरल्यास तिला आणखी सात दिवस तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.
ही घटना २६ सप्टेंबर २०१६ रोजी घडली होती. पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल गस्तीवर होते. त्यावेळी त्यांनी तीन महिला आणि दोन तरुणांना अश्लील चाळे करताना पकडले होते. त्यावेळी महिला आणि तिच्या चार मित्रांविरोधात भादंवि कलम २९४ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन) अन्वये कारवाई करण्यात आली होती. महिलेसह तिचे चारही मित्र नवी मंडी परिसरात एकमेकांसोबत अश्लील चाळे करताना दिसले होते, असे पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले होते. या प्रकरणात त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. अन्य चौघांमध्ये दोन महिला आणि दोन तरूण होते. त्यांच्याविरोधातही खटला सुरू आहे. तर या महिलेच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे.




