नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही सलामीवीर जोडी खूप दिवसानंतर पुन्हा मैदानात दिसणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताकडून हे दोघे डावाची सुरुवात करतील. 5 मार्च ते 21 मार्च या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या या सीरिजमध्ये एकूण 6 संघ सहभाग घेत आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही सीरिज खेळवली जाणार आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज आजपासून सुरू होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना बांग्लादेश संघाशी होईल. ही बहुप्रतिक्षित सीरिज रायपुरमधील शहीद वीरनारायण स्टेडियमवर सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या सीरिजचा शुभारंभ करणार आहेत.
या सीरिजमध्ये केवळ क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या दिग्गजांचा समावेश असतो. अलीकडेच भारताचा अष्टपैलू युसुफ पठाण, वेगवान गोलंदाज आर. विनय कुमार आणि यष्टीरक्षक नमन ओझा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. ते सर्व या मालिकेत खेळताना दिसतील. भारताचे प्रमुख खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युवराज सिंग अशी मोठी नावे देखील यात आहेत.
वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स, इंग्लंडचा केविन पीटरसन आणि बांग्लादेशचा मोहम्मद नाझीमुद्दीन या जगभरातील अन्य मोठ्या खेळाडूंचा देखील यात सहभाग आहे. या मालिकेत भारत, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सहभागी होतील. आज संध्याकाळी पहिल्या सामन्यात भारत आणि बांग्लादेश हे संघ खेळणार आहेत. मालिकेचा उपांत्य सामना 17 आणि 19 मार्च रोजी खेळला जाईल. आणि 21 मार्चला फायनल सामना खेळवला जाईल.