उत्तर प्रदेश : एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह झाडावर लोंबकळलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. उत्तर प्रदेशातील अमेठी येथील जामो स्टेशन परिसरात ही घटना घडली. मात्र, पीडित कुटुंबानं आपल्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हत्येनंतर मुलीने आत्महत्या केल्याचं दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले.
पीडित कुटुंबानं सांगितलं कि, आमची मुलगी गुरुवारी संध्याकाळी बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही तेव्हा गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा मुलीचा मृतदेह सीगो तलावाजवळ एका झाडाला लोंबकळलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीच्या शरीरावर जखमा आहेत, तसंच तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव होत होता. मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आणि नंतर मृतदेह झाडाला लटकावण्यात आला, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कुटुंबाकडून मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच भीम आर्मीचे नेते आनंद सिंह यांच्यासहीत इतर सदस्य पीडित मुलीच्या गावी पोहचले. त्यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांनी मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.




