नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
कडक शिस्तीच्या मुंढेंनी राजकारण्यांनाही न जुमानता त्यांची कार्यपद्धती सुरू ठेवली होती. तसंच, मनपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात हजर राहणे बंधनकारक केलं होतं. मिटिंगमध्ये उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ताकीद दिली होती. तुकाराम मुंढेंची बदली होताच मनपातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुन्हा एकदा कार्यालयात उशीरा येण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, महापालिका बरखास्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांना नागपुरात पाठवले, अशी सुरुवातीला चर्चा होती. शिवसेना आणि भाजप हे सध्याचे नवे राजकीय शत्रू आहेत. भाजपला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या अधिकाऱ्याची बदली मुख्यमंत्र्यांनी का, कशी केली, याविषयी सोशल मीडियावर सध्या चर्चा चालू आहे.




