मराठी चित्रपटांसह मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या नित्यश्री ज्ञानलक्ष्मी या मूळच्या संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावच्या रहिवासी. कोरोनाच्या काळात मागील चार महिन्यांपासून त्या आपल्या गावी आहेत. या काळात वेळेचा सदुपयोग म्हणून त्यांनी आपल्या गावात त्यांच्या आजीच्या नावे अतिशय सुंदर बाग निर्माण केली.
नित्यश्री यांनी नुकताच आपला वाढदिवस आजीच्या नावे बाग उभारून साजरा केला. यावेळी त्यांनी आपल्या लहान भावंडांच्या मदतीने निरनिराळी फळझाडे, फुलझाडे तसेच शो ची देखील झाडे लावली. या बागेत लक्ष्यवेधक असे तुळशी वृंदावन देखील उभे केले आहे. वाढदिवशी त्यांच्या आई-वडिलांच्या हस्ते या बागेचं उदघाटन करण्यात आलं.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते व ‘सह्याद्री देवराई’ चे प्रणेते सयाजी शिंदे यांनी मालुंजे येथे जाऊन ‘आजीची बाग’ ला भेट दिली. त्यांनी यावेळी बेल, रुद्राक्ष, आवळा, फणस, पारिजात, जांभूळ अशी अनेक रोपं आणली होती. त्यांनी ह्या रोपांचे वृक्षारोपण देखील केले. सयाजी शिंदे यांनी नागरे कुटुंबासमवेत चुलीवरील जेवणाचा आस्वाद देखील घेतला.
नित्यश्रीने याविषयी तिचे काही विचार मांडले. ती म्हणाली, मित्रांनो, आपला वाढदिवस हा आपल्या प्रत्येकासाठी खूप खास असतो आणि असायलाच हवा..त्या दिवशी आपण मोठमोठ्या पार्ट्या करतो,पैसे उधळतो..पण हे सगळं न करता आपण हा खर्च निसर्गासाठी केला तर? मी माझ्या प्रत्येक वाढदिवशी एक तरी झाड लावते आणि इतरांकडून लावून ही घेते..निसर्गाने आपल्याला खूप काही दिलं आहे त्यामुळे आपणही त्याला काही देणं लागतो..आपण लावलेलं झाड पुढील अनेक वर्षे सावली,ऑक्सिजन, फळं, फुलं देतं..झाड नसेल तर आपल्या अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा देखील पूर्ण होणार नाहीत,हा विचार केलाय तुम्ही? निसर्गाकडून आपण फक्त घेत आलोय,देण्यासाठी आपले हात कधी सरसावणार? झाडाचं आणि आपलं एक निस्वार्थी नातं आहे,तर हे नातं आपण प्रामाणिकपणे जपुया..




