आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होत आहे. दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. परंतू संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही.
युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंडिया टुटेने ही बातमी दिली आहे. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे. बीसीसीआयने युएईत दाखल झाल्यानंतर सर्व संघांना मार्गदर्शक तत्व आखून दिली होती. चेन्नईचा संघही या सर्व नियमांचं पालन करत होता. अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत.
राजस्थान, पंजाब यासारख्या संघांनी आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.



