सांगली : सांगलीत हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. फांदी तुटण्याचा आवाज न आल्याने तरुण फांदीच्या खालीच बसून राहिला आणि झाडाची फांदी अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलाच्या अकाली मृत्यूने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हर्षवर्धन कदम हा मिरज मेडिकल कॉलेजच्या मैदानावर दररोज पोलीस भरतीच्या सरावासाठी यायचा. व्यायामानंतर तो कॅम्पसच्या कंपाउंडच्या भिंतीवर बसला होता आणि त्याच्या कानात हेडफोन होते. हर्षवर्धन जिथे बसला होता, त्याच्यामागे एक मोठे वडाचे झाड होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड जोरात हलत होते. मात्र, हर्षवर्धनच्या कानात हेडफोन असल्यामुळे त्याला कोणताच आवाज आला नाही. जोरदार वाऱ्याने झाडाची फांदी तुटून हर्षवर्धनच्या अंगावर येऊन पडली. हर्षवर्धनचे डोके फांदीखाली आले. झाडाची फांदी खूप मोठी असल्याने जबर मार बसला आणि हर्षवर्धनचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत पोलीस व अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने हर्षवर्धनचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हर्षवर्धनचे वडील सलून व्यावसायिक आहेत. त्यांना आपला मुलगा पोलिसात भरती होईल, अशी आशा होती. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




