मुंबई : सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांचे आज (५ जुलै) निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईच्या होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या निधनाची माहिती दिली.
१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये (NIA) त्यांना अटक केली होती. आज कोर्टाने त्यांची जामीन याचिका सुनावणीसाठी घेतली असता त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या निधनाची माहिती दिली.
स्वामी यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यासाठी त्यांच्या वकिलांनी सोमवारी सकाळी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कारण रविवारी प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. स्वामींना मे महिन्यापासून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने त्यांना रविवारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, स्वामींची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांचे वकील मिहिर देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते.
दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून अशी मागणी केली होती की, स्टेन स्वामी यांना वैद्यकीय सेवा आणि उपचार देण्यासाठी ‘सर्वतोपरी प्रयत्न’ केले जावेत. स्टॅन स्वामी यांना पार्किन्सन आजाराने ग्रासले आहे. मूळचे केरळचे असणारे आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले फादर स्टॅन स्वामी जवळपास पाच दशकांहून अधिक काळ अधिक काळ झारखंडमध्ये आदिवासींसोबत काम करत होते.
Heartfelt condolences on the passing of Father Stan Swamy.
He deserved justice and humaneness.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 5, 2021




