मुंबई : निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून आपण अजून चांगली अपेक्षा करु शकत नाही.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीची एक शाखा आहे. यात आपण काय करु शकतो? दरम्यान बिहार निवडणुकीवर लक्ष असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाल्यास मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, या युवा नेत्याकडे कोणाचाही पाठिंबा नाही तसेच सीबीआय आणि ईडी सारख्या संस्था त्यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य तुरुंगात आहेत. तरीदेखील ते केंद्र सरकारला आव्हान देत आहेत. केंद्र सरकार विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तरिही तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.