पुणे : क्राऊड फंडिंगमधून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिल्यानंतरही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमकुलीचं निधन झालं आहे. एक ऑगस्ट रोजी सायंकाळी खेळता खेळता अचानक वेदिकाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
वेदिका आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजार झाला. त्यानंतर क्राऊड फंडिंगमधून तिला वाचवण्यासाठी १६ कोटी रुपये जमा केले होते. याच पैशांमधून तिला जून महिन्यात झोलगेन्स्मा इंजेक्शन देण्यात आलं होतं. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. तरीदेखील त्यानंतर दीड महिन्यातच वेदिकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी म्हणजेच एसएमए नावाने ओळखला जाणारा हा आजार शरीरात एसएमएन- वन या जनुकांच्या कमतरतेमुळे होतो. या कमतरतेमुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेताना त्रास होतो. हा आजार लहान मुलांना अधिक प्रमाणात आढळून येतो. या आजारामध्ये उपचारांसाठी देण्यात येणारे झोलगेन्स्मा इंजेक्शन केवळ अमेरिका, जर्मनी आणि जापानमध्ये बनते. या इंजेक्शनचा एकच डोस रुग्णाला दिला जातो.




