पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील इस्कॉन चौक येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. या अपघातात जेएसपीएम संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय रमा कापडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमा कापडे या कात्रज–कोंढवा रोडवरून दुचाकीवरून जात असताना त्या चुकून विरुद्ध दिशेने गेल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यास सुमारे ३० मिनिटांचा विलंब झाला. जखमी अवस्थेत रमा कापडे यांना तातडीने जवळील भारतीय विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, ट्रक चालकाची भूमिका, वाहतुकीचे नियोजन आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, या साडेतीन किलोमीटर लांबीच्या कात्रज–कोंढवा रोडवर गेल्या साडेचार वर्षांत ५५ हून अधिक अपघात झाले आहेत, ज्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या मार्गावर रस्ते सुरक्षा उपायांची तातडीने गरज असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.




