पुणे : 14 जूनच्या रात्री फॅशन स्ट्रीट येथे एका व्यापाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी ही घटना व्यापारी संघटनांच्या दोन गटांच्या वैमनस्यातून घडल्याचे सांगितले.
झुल्फिकार कुरेशी याने तौफिक अख्तर शेख याच्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गोळी झाडली असून यात तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तौफिकने तक्रार केल्यानंतर लष्कर पोलीस ठाण्यात झुल्फिकार कुरेशी, तबरेज कुरेशी आणि शानू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे स्वरूप गंभीर असल्याने गुन्हे शाखेलाही समांतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार युनिट २ चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार केली.
हेडकॉन्स्टेबल मोहसीन शेख यांना कॅम्पमधील भीमपुरा येथील रहिवासी नईम उर्फ शानू सलीम शेख आरोपींपैकी एक असल्याची माहिती मिळाली. बुधवारी (१५ जून) रात्री लुल्लानगर चौकाजवळ त्याला पकडण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या पथकात एपीआय विशाल मोहिते, पीएसआय राजेंद्र पाटोळे आणि पोलीस शिपाई निखिल जाधव, उत्तम तारू, विनोद चव्हाण, प्रमोद कोंकणे, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, मोहसीन शेख यांचा समावेश होता.




