पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून एकाने त्याच्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव राहुल माने (वय 25) असून त्याने सिध्दार्थ काटकर (वय 20) याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल माने याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्याने २ जून रोजी पत्नीचा भाऊ सिध्दार्थ काटकरला फोन करून भेटायला बोलावले. आरोपी राहुल याने काही वेळाने सिध्दार्थला घरी सोडतो असे सांगुन आंबेगाव-बद्रुक येथे गायमुख चौक येथील मोकळया ग्राऊंड मध्ये नेले. तिथे राहुल आणि त्याचे काही साथीदार गणेश बाबु ओव्हाळ (वय 26, रा. अभिनव कॉलेज पाठीमागे, आंबेगाव बद्रुक) आणि अक्षय सुनिल येवले (वय 28, रा. आंबेगाव-बद्रुक) होते. त्यांच्यासह इतर 3 अनोळखी व्यक्तीदेखील होत्या. या सर्वांनी सिध्दार्थ याचा मोबाईल फोन व सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेतली आणि “तुला जीवेच मारुन टाकतो, मला जेलमध्ये जायची सवय आहे, मी जेल मधुन लगेच सुटुन बाहेर येणार” असे बोलुन लोखंडी सत्तुराने सिध्दार्थला मारहाण केली. नंतर त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी सत्तुराने त्याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सिध्दार्थ काटकर याने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.




