पुणे : पुणे शहरातील पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळया ठिकाणी जसे शासकिय कार्यालये, निम शासकिय कार्यालये, खाजगी संस्था, खाजगी कार्यालये, कंपन्या इत्यादी ठिकाणच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी तसेच, त्यांनी मदत मागितल्यास त्यास त्वरित व विनाविलंब प्रतिसाद देण्यासाठी बडी कॉपची नेमणूक करण्यात आलेली आहे.
घरी राहणाऱ्या गृहिणी अथवा अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास व त्यांनी कठिण प्रसंगी मदत मागितल्यास त्यांनासुध्दा बडी कॉप प्रतिसाद देतील. नोकरदार महिलांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा उंचावणे, नोकरदार महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करणे, तसेच नोकरदार महिलांना २४ तास पोलीस मदत आणि प्रतिसाद सुनिश्चित करुन, गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, हे यातून साध्य होणार आहे.
सर्व परिमंडळमधील पोलीस स्टेशन हद्दीत नोकरपेशा महिला असल्याने, बडी कॉपसाठी नोडल अधिकारी व अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये आवश्यकतेप्रमाणे 5 ते 15 कर्मचाऱ्यांची बडीकॉप म्हणुन निवड करण्यात आली आहे. बडी कॉपसाठी नेमणूक केलेले पोलीस अंमलदार यांनी वेगवेगळया क्षेत्रातील नोकरदार महिलांचे व्हॉटस्अप ग्रुप तयार करावेत. एका ग्रुपमध्ये एक बडी कॉप, चौकी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक व 100 ते 150 नोकरदार महिला राहतील. ग्रुपमधील संबंधित महिला अडचणीच्या वेळी बडी कॉप यांना व्हॉटस्अप किंवा फोनद्वारे संपर्क साधतील. कोव्हीड-१९ या संसर्गजन्य प्रादुर्भावाच्या काळात 2 वर्षे बडी कॉप प्रणालीचे कामकाज बंद होते. आता बडी कॉपचे कामकाज सुरळीत चालू झाले असून, बडी कॉपचा नवीन व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला आहे.
नोकरदार महिलांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा महिलांसोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध त्वरित तक्रार दाखल करण्यात येईल. पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी 24 तास सेवेत आहे. यासंदर्भात कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, तसेच इतर पुरुषांकडून दिल्या जाणाऱ्या निंदाजनक वागणूकीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घेतील. वरिष्ठ पोलीस निरिक्षक हे बडी कॉप उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहतील. संबंधित कंपन्यांशी समन्वय साधून सदर उपक्रमाबाबत नोकरपेशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्व पटवून देऊन अधिकाधिक महिलांना उपक्रमात सामील करुन घेण्यात येईल.
महिलांची होणारी छेडछाड, त्यांच्यासोबत रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी, निर्जन स्थळी, निर्जन रस्त्यावर होणारे अत्याचार आणि गैरप्रकार यांना आळा घालण्यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे पातळीवर, पोलीस आयुक्तालयाचे ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करुन, सुरक्षिततेबाबत महिलांना सजग करण्यात येईल. महिला सुरक्षासंदर्भात पोलीस ठाणेतील महिला सुरक्षा समिती, समुपदेशन केंद्रे, दामिनी पथक, महिला सहाय्य कक्ष इत्यादींचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
सदर योजना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची असुन, ती पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पुणे शहराचे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ व नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-2 यांचे मार्गदर्शनाखाली विशेष बाल सुरक्षा पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व सहा. पोलीस निरीक्षक अर्चना कटके व स्टाफ हे पाहणार आहेत.




