पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळी हा मृतदेह आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव आयान शेख (वय 6) असे आहे. जांभुळवाडी गावच्या हद्दीत नागरिकांना महामार्गाच्या कडेला एका मुलाचा मृतदेह आढळला. त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपस सुरु केला. यावेळी त्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, या मुलाचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. त्यामुळे मुलाची ओळख पटविण्यात आली आहे. दरम्यान, मुलाचा खून करून या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यानुसार पुढील तपास सुरु केला आहे.




