pimpari chinchwad unknown person fired on ncp mla anna bansode

आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण : बनसोडे यांच्या मुलासह 21 जणांवर गुन्हा दाखल

पुणे महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजी पवारने केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला. मात्र ते गोळीबारातून सुखरुप बचावले. तेथे त्यांचे २०-२२ कार्यकर्ते उपस्थित होते, त्यापैकी कोणीही जखमी नाही. पालिकेचे कंत्राटदार सिजू अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने गोळीबार केल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली. आमदार बनसोडे यांनी पोलिसांना सांगितलं कि, “मी स्वतः तानाजीला बोलाऊन घेतलं होतं, त्यानंतर त्याने एकेरी उल्लेख केला, त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. तर त्याने माझ्या दिशेने गोळीबार केला, सुदैवाने मी यातून बचावलो.” तानाजी हे सीआरपीएफचे निवृत्त जवान असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील सत्ताधारी आमदारांवर गोळीबार झाल्याचं कळताच पोलिसांनी तातडीने तानाजी पवार यांना अटक केली. आमदार बनसोडे यांनी तानाजी पवारसह तिघांनी हा कट रचल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला.

आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामध्ये 11 मे रोजी फोनवरुन झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत आहेत. तानाजी मात्र आपण योग्य भाषा वापरावी, असं अनेकदा सांगत होता. परंतु आमदार बनसोडे तू उद्या ये मग बघू, असं म्हणाले.

दरम्यान, अँथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर 11 मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले. यात आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ आणि आमदारांचा पीए यांच्यासह दहा जणांनी अँथोनी यांच्या कार्यालयात प्रवेश केला. तानाजी पवार कुठे आहे ते सांगा, असं धमकावलं. त्यांनी माहित नाही असं म्हटल्यावर दोन कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर खेचलं. तिथे दोघांवर सशस्त्र हल्ला केला. हे फूटेज समोर आल्यानंतर या आधारावर आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ आणि आमदारांचा पीए यांच्यासह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.

तानाजी पवार यांनी देखील पिंपरी पोलिसांकडे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यांनी आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 21 जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यात ऑडिओ क्लिपचा देखील उल्लेख आहे. तानाजी पवार यांनी तक्रारीत सांगितलं कि, “घटनेच्या दिवशी आमदारांच्या पीएसह दोघांनी माझं अपहरण केलं. तिथून घटना घडलेल्या ठिकाणी मला आणलं. तिथं आमदार स्वतः उपस्थित होते. ऑडिओ क्लिपमधील संवादात मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा अशी मी माफी मागितली. तेव्हाच आमदारांचा मुलगा सिद्धार्थने मला कार्यालयातून बाहेर आणलं. त्याच्या हातात घातक शस्त्र होतं, त्याने माझ्या डोक्यावर वार केला. इतरांनी बेल्ट, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत माझा जीव जाण्याची शक्यता होती. त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी मी माझ्याकडे असणाऱ्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. नंतर तीच बंदूक एकाने माझ्याकडून हिसकावली. नंतर मला एक गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर पोलीस आले आणि मला ताब्यात घेतलं.”

या संपूर्ण प्रकरणात दाखल झालेले गुन्हे पाहता आमदारांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच आमदारांनी तानाजीला बोलावलं होतं की त्याचं अपहरण केलं होतं? तानाजीने हवेत गोळी झाडल्याचं तक्रारीत सांगितलं पण आमदारांनी आपल्यावर गोळी झाडल्याचा दावा केला. तानाजी पवारला अटक करण्यात आली मग आता बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह इतरांना अटक होणार का? हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत