मुंबई : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला, या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाजवळ हा अपघात झाला. सर्व मृत पुरुष असून चार जखमींपैकी एक महिला असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जात असताना रात्री 12 च्या सुमारास कार ट्रकला मागून धडकली. सर्व 9 जण एर्टिगामध्ये प्रवास करत असताना हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रकला धडकली, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




