लोणावळा : पवना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (११ जुलै) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात घडली. शुभम सुरेश दुधाळ (वय- २१, पुणे) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा भाऊ संकेत यांच्यासह सहा मित्र रविवारी सकाळी तुंग किल्ला येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते दुपारी १२ च्या सुमारस पवना धरणातील श्री. वाघेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पवनाधरणात पोहण्यासाठी गेले. मात्र, पोहत असताना शुभम पाण्यात बुडाला. त्याला बुडताना बघून त्याच्या मित्रांनी घाबरून आरडाओरडा केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक युवक रोहित उर्फ छोट्या जाधव, अक्षय उंबरकर, रमेश गोणते, तानाजी घारे यांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. दोन तास प्रयत्न केल्यानंतर बुडालेल्या तरूणाला बाहेर काढण्यात यश आले.
ज्या ठिकाणी युवक बुडाला ती हद्द वाघेश्वर गावची असल्याने ती वडगाव पोलिसांची असल्याचे समजल्यानंतर येथे वडगाव पोलिसांना पंचनाम्यासाठी बोलवले गेले. त्यानंतर वडगाव पोलिस येथे दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलिस करत आहेत.




