ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब आणि इतर काही नेते उपस्थित होते. मात्र, भास्कर जाधव या बैठकीला उपस्थित नसल्यामुळे चर्चा सुरू झाल्या. यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. “भास्कर जाधव हे जेष्ठ नेते आहेत. उगाच तुम्ही इथे आले नाहीत, ते आले नाहीत, ते रुसले, ते फुगले, असं काय? एकनाथ शिंदे आहेत का?”, असा खोचक सवाल करत राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली.
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितलं, “भास्कर जाधव यांनी तुमची भूमिका आवडत नाही, हे वारंवार सांगितलं आहे. भास्कर जाधव हा रांगडा माणूस आहे, आणि शिंदे साहेबांच्या स्वभावाशी जुळणारा माणूस आहे. तुम्ही कितीही त्याची आरती ओवाळायचा प्रयत्न करा, तरी भास्कर जाधव तुमच्याबरोबर राहणार नाहीत. तो फक्त वेळेची वाट पाहात आहे,” असं शिरसाट यांनी म्हटलं.
तसेच, “भास्कर जाधव तुमच्याबरोबर राहणार नाहीत. तुम्ही कितीही तारीफ करा किंवा साहेब म्हणून काहीही करा, पण आता ते शिंदे गटातच राहणार हे जवळपास निश्चित झालं आहे,” असा दावा शिरसाट यांनी केला.