ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करतांना म्हटलं, “फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाहसुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील.” ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं. यावर संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं.
या टीकेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आणि संजय राऊत यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “काय बोलावं आता या माणसाबद्दल? ‘मुंगिरी लाल की हसीन सपने’ याप्रमाणे हा माणूस बोलत आहे. शेखचिल्ली सारखे प्रकार त्यांचे चालले आहेत. वाटेल ते बरळायचं…” गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर जोरदार घणाघात करत सांगितलं की, “सध्या जोकरच्या भूमिकेत संजय राऊत आहेत. सकाळपासून ते काहीही बडबडत आहेत.”