नाशिक : नाशिकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच बलात्कार केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा बिहारचा आहे. तो कुटुंबीयांसोबत नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. दरम्यान, पीडित मुलीची आई सतत गावाला जायची. त्यातच या गोष्टीचा गैरफायदा घेत आरोपी स्वतःच्या मुलीवरच बलात्कार करत होता.
दरम्यान, पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिची आई तिला घेऊन नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गेली होती. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर ती गर्भवती राहिल्याची बाब समोर आली. पीडित मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असल्याचे कळताच मुलीच्या आईने अज्ञात व्यक्तीविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. त्यांनी १०० पेक्षा जास्त जणांची चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना समजले की पीडित मुलीची आई दीड महिन्यांपासून गावी गेलेली होती. त्यानंतर पोलिसांना शंका आली आणि त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांचा डीएनए तपासला. डीएनए चाचणीनंतर पीडित मुलीवर वडिलांनीच बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.




