मुंबई : जोगेश्वरी पूर्व भागातील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. पेट घेताच तिने प्रियकराला मिठी मारली. यात गंभीर जखमी झालेली प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर प्रियकराचा मृत्यू झाला आहे.
मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांधी नगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. या दोघांचे जवळपास अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघांमध्ये काही काळापासून खटके उडत होते. विजयला या तरुणीशी लग्न करायचे होते. मात्र, दारुच्या सवयीमुळे विजय वारंवार तरुणीचा छळ करत होता. कंटाळून प्रेयसीने विजयशी प्रेमसंबंध ठेवण्यास आणि त्याच्याशी लग्न करण्यासही नकार दिला होता. तिच्या घरच्यांचा देखील या लग्नाला विरोध होता. त्यामुळे राग अनावर होऊन विजयने हे कृत्य केलं.
शनिवारी (६ फेब्रुवारी) पीडित तरुणी घरी एकटीच असल्याची माहिती विजयला मिळाली. त्यानंतर प्रेयसीला जाळण्यासाठी विजय पेट्रोल घेऊन गेला. तिच्या घरी गेल्यानंतर विजयने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. पेट घेताच तिने विजयला मिठी मारली. त्यामुळे तिच्यासोबत विजयही पेटला. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत आग विझवली आणि दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, आगीत होरपळून विजयचा मृत्यू झाला होता. तर प्रेयसी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झूंज देत आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे. तरुणीच्या भावाच्या तक्रारीवरून मयत प्रियकर विजय खांबे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.




