मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. कारवाईमध्ये ध्रुवकडून ३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलकडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव ताहिल मार्च २०२० पासून मुजम्मिल अब्दुल रहमान शेख नावाच्या एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी मुजम्मिलला अटक केली होती. चौकशीत त्यानं ध्रुव ताहिलला ड्रग्ज पुरवल्याचं मान्य केलं होतं. आरोपी मुजम्मिलच्या मोबाइलची तपासणी करण्यात आली होती. त्यातून ध्रुव ताहिल आणि मुजम्मिल व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचं समजलं होतं. ध्रुव ताहिलनं अनेकदा मुजम्मिलकडून ड्रग्ज मागवले होते. याशिवाय ध्रुव ताहिलनं मुजम्मिल याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केल्याचेही पुरावे सापडले आहेत.
त्यानुसार, ५ मे रोजी मुंबई पोलिसांनी ध्रुवच्या घरावर छापा टाकत कारवाई केली. यावेळी ध्रुव ताहिलकडे मुंबई पोलिसांना ड्रग्जदेखील सापडले. अँटी नार्कोटिक्स सेलनं कारवाई करत त्याला अटक केली. दरम्यान, याबाबत अभिनेता दिलीप ताहिल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.




