मुंबई : मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९४५ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय करण्यात आला आहे.
सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज सादर केला. पालिकेच्या शाळांचे नामांतर ‘मुंबई पब्लिक स्कुल’ असे करण्यात येणार आहे. महानगर पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कुल (M.P.S) जोडण्यात येणार आहे. त्यासाठी नवा लोगोही तयार करण्यात आला आहे.
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. त्यामुळं या वर्षीच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि चॅट बोटच्या माध्यमातून करिअर काऊन्सिलिंग साठी २१.१० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता शाळा सुरु होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शाळांसाठी सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर यासाठी १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार असून त्यासाठी 28.58 कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
शिक्षण विभाग अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये :
- पुढील वर्षात १० नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार
- बालवाडी सक्षमीकरण साठी स्वयंसेवी संस्थांशी करार
- २४ शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण सुविधा वाढविणार
- २७९ मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांमध्ये ६ महिन्याच्या कालावधीसाठी रॉकेट लर्निंग व आकांक्षा फाऊंडेशन या एनजीओमार्फत प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार
- २४ शाळांमध्ये संगीत केंद्र सुरू करणार




