मुंबई : नवीन वर्षातील पहिल्या आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मनात हा विचार आहे. याबाबत ते अनेकांशी चर्चाही करत आहेत’, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती देतानाच विजय वडेट्टीवार यांनी रेल्वेकडून होणाऱ्या आडकाठीवरही नाराजी व्यक्त केली.
‘सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आम्ही आधीही रेल्वेकडे प्रस्ताव दिला होता. आम्ही ही परवानगी मागितली तेव्हा रेल्वेने श्रेयासाठी ती परवानगी नाकारली. आमच्या प्रस्तावात अनेक त्रुटी दाखवून तो प्रस्ताव परत पाठवला गेला. तुम्ही सुरक्षा कशी करणार? गर्दी कशी टाळणार? अंतर कसं पाळणार?, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले’, असे नमूद करत वडेट्टीवार यांनी रेल्वेच्या आडमुठेपणावर भाष्य केले. रेल्वेला हवे तेवढे मनुष्यबळ देण्याची व पाहिजे त्या सुविधा पुरवण्याची आमची तयारी आहे, असे सांगत वडेट्टीवार यांनी सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वेला केले जाईल, असा विश्वासही दिला.