दिल्ली मेट्रोने सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात अनेक विक्रम नोंदवले आहेत. आता 28 डिसेंबरपासून देशात प्रथमच दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाइनवर विनाचालक मेट्रो धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिवशी ड्रायव्हरलेस मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. मॅजेन्टा लाइन हा देशातील पहिला मेट्रो कॉरिडोर असेल, ज्यावरून या तंत्रज्ञानाच्या आधारे मेट्रो ऑपरेट केली जाईल. डीएमआरसी (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) च्या मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षातून मेट्रोला नियंत्रित केले जाईल. मॅजेन्टा लाइननंतर पिंक लाईनवर देखील ड्रायव्हरलेस मेट्रो ऑपरेट केली जाणार आहे.
फेज तीनच्या या तीनही कॉरिडोरवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिग्नल यंत्रणा वापरली गेली आहे. या मदतीने या दोन्ही कॉरिडॉरवर ड्रायव्हरलेस मेट्रो चालविली जाऊ शकते. सध्या या दोन्ही कॉरिडॉरच्या मेट्रोमध्ये चालक उपस्थित आहेत. डीएमआरसीने काही महिन्यांपूर्वी ड्राईव्हरलेस मेट्रो चालविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली होती. ज्याने दोन्ही कॉरिडॉरच्या मेट्रो ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, नियंत्रण कक्ष इत्यादींची पाहणी केली. त्यानंतर मॅजेन्टा लाइन कॉरिडॉरवर काही तांत्रिक बदल करण्यात आले.
अलीकडेच केंद्र सरकारने ड्रायव्हरलेस मेट्रोच्या कामकाजास मान्यता दिली होती. यानंतर बोटॅनिकल गार्डन ते जनकपुरी पश्चिम दरम्यान 37 किमी लांबीच्या मॅजेन्टा लाइनवर ड्रायव्हरलेस मेट्रो चालविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 24 डिसेंबर रोजी मेट्रोने आपली 18 वर्षे पूर्ण केली आहेत. 28 डिसेंबरपासून ड्रायव्हरलेस मेट्रोचे काम सुरू होताच डीएमआरसीचे हे यावर्षीचे सर्वात मोठे यश असेल. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतात विनाचालक मेट्रो धावेल.